Uncategorized

झाडांची बेकायदेशीर तोड; मुख्याध्यापकाने परस्पर विकली झाडे वन

वन विभागाकडून गुन्हा दाखल; कारवाईची मागणी तीव्र

लाखनी प्रतिनिधी : लाखनी तालुक्यातील गोविंद विद्यालय, पालांदूर येथील शालेय परिसरातील मौल्यवान वृक्षांची विनापरवानगी तोड करून त्यांची बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ च्या कलम ३ व ४ अंतर्गत वन विभागाने गुन्हा नोंदविला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी तीव्र झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी यांच्या पत्रानुसार प्रभारी मुख्याध्यापक आनंदराव मदनकर यांनी शाळेच्या मालकीचे एकूण ८ वृक्ष — सागवान ६, शिसम १ व लिंब १ — विनापरवानगी तोडून संगनमताने विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वन अपराध पहिले प्रतिवृत्त क्रमांक ०३४८८/०३/२०२६, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार आल्हाद दिगंबर भांडारकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित मुख्याध्यापकांनी ही झाडे पालांदूर येथील युवराज शिवणकर यांना विकली. त्यानंतर शिवणकर यांनी झाडांची तोड करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांची वाहतूक केली. तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने झाडांचे मुळासहित खोड काढण्यासाठी हेमराज कापसे यांच्या जेसीबी मशीनचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात झाडे तोडण्यासाठी वापरण्यात आलेले आरे, कटिंग मशीन, वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर तसेच जेसीबी यंत्र जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारीला सुमारे सहा महिने उलटूनही ठोस कारवाई झालेली नसल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तातडीने कारवाई न झाल्यास वन विभाग कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. तसेच दोषींना अटक करून तोडलेली झाडे हस्तगत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, एका बाजूला “हरित महाराष्ट्र अभियान” राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना, शाळेतील मुख्याध्यापकांकडूनच झाडांची तोड होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांनाही धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अलीकडेच भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षसंवर्धनासाठी कठोर पावले उचलली असताना, शैक्षणिक संस्थेतील वृक्षतोड अधिकच चिंताजनक ठरत आहे. वन परिपरीक्षेत्र अधिकारी अड्याळ, योगेश शर्मा यांनी सांगितले की, प्रभारी मुख्याध्यापक आनंदराव मदनकर यांच्यावर १८ एप्रिल २०२६ रोजी वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, ही झाडे संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर यांनी आपल्या वडील गोविंदबापू लाखनीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावली होती. त्यामुळे या वृक्षतोडीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |